औराद शहाजानी (जि. लातूर): निलंगा तालुक्यातील तांबाळा येथे निवडणुकीनंतर दगडफेकीची घटना घडली. याबाबत औराद शहाजानी पाेलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती. पाेलिसांनी सांगितले की, तांबाळा येथील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. निकालानंतर गावात विजयी उमेदवार दाखल झाले. यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी घाेषणा देण्याला प्रारंभ केला. दरम्यान, अचानक दगडफेकीला सुरुवात झाली. यामध्ये माेटारसायकल आणि चारचाकी वाहनांसह इतर वाहनांचे नुकसान झाले, अशी माहिती समाेर आली आहे. शिवाय, काही नागरिक जखमीही झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच औराद शहाजानी, कासार शिरसी ठाण्याचे पाेलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक गावामध्ये दाखल झाले.
निलंगा उपविभागीय पाेलीस अधिकारी दिनेशकुमार काेल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्याला कडेकाेट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गावात रात्री उशिरापर्यंत शांतता कमिटीची बैठक सुरू हाेती. दरम्यान, वादाला अवैध व्यवसायासह मटका-जुगारांची किनार असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. याबाबत औराद शहाजानी ठाण्याचे सपाेनि. संदीप कामत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फाेन उचलला नाही.