अकोला: अकोट तालुक्यातील जऊळका येथील जिल्हा परिषद शाळेच्या नूतनीकरणाच्या देयकाच्या रकमेचे आरटीईजीएस फॉर्मवर स्वाक्षरी करण्यासाठी ग्रामसेवकाने पैसे मागितले. परंतु तक्रारदार कंत्राटदारास लाच द्यायची नसल्याने त्याने एसीबी कडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी करून बुधवारी दुपारी कारवाई केली. या प्रकरणात खासगी व्यक्तीला अटक केली असून, ग्रामसेवक फरार झाला आहे.
अकोला येथील ३० वर्षीय शासकीय कंत्राटदाराला जऊळका येथील ग्रामसेवक उत्तम देवीदास तेलगोटे (५२, रा. खानपूर वेस अकोट) याने ३५ वर्षीय आशीष दत्तात्रय निपाने यांच्या मदतीने पैशांची मागणी केली. जऊळका येथील जि.प. प्राथमिक शाळेच्या नूतनीकरणाचे बांधकाम या कंत्राटदाराने केले आहे. या कामाचे कंत्राट हे चार लाख ६६ हजार १३२ रुपये होते. या रकमेच्या आरटीजीएस फॉर्मवर सह्या करण्यासाठी ग्रामसेवकाने कंत्राटदाराला ४६ हजारांची लाच मागितली होती.
या प्रकरणाची एसीबीने २९ जुलै ते २ ऑगस्ट २०२२ दरम्यान चौकशी केली. दरम्यान, ग्रामसेवकाने तडजोडी अंती ४० हजार रुपये स्वीकारताना खासगी व्यक्ती आशिष निपाने याला ईसार पेट्रोल पंप करोली फाटा चोहोट्टा बाजार, ता. आकोट येथे स्वीकारताना पंचा समक्ष ताब्यात घेले. ग्रामसेवकाचा अकोट येथे जाऊन शोध घेतला असता तो घरी व परिसरात मिळून आले नाही. ही कारवाई अकोला एसीबीचे उपअधीक्षक उत्तम नामवाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सचिन सावंत, प्रदीप गावंडे, राहुल इंगळे, किशोर पवार, नीलेश शेगोकार यांच्या पथकाने केली. या प्रकरणात इसीबीने संबंधित ग्रामसेवक व खाजगी व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला.