कल्याण: मालमत्तेच्या वादातून नातवाने चुलत आजोबाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना येथील पश्चिमेकडील बेतूरकरपाडा परिसरात सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या घटनेत चुलत काकावरही प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हत्या करणा-या नातवाला महात्मा फुले चौक पोलीसांनी अटक केली आहे.
हर्षल ठाणगे (वय 23)असे आरोपीचे नाव आहे. नारायण, कुंडलिक आणि सुभाष या तिघा भावांनी त्यांचा वडीलोपार्जित भूखंड 2012 मध्ये विकासकाला बांधकामासाठी दिला होता. याप्रकरणी झालेल्या व्यवहारात दिल्या गेलेल्या दुकानाच्या गाळयावरून नारायण आणि कुंडलिक यांच्यात वाद सुरू होता. हा वाद कल्याण न्यायालयातही प्रलंबित आहे. दरम्यान या वादातून कुंडलिक यांचा नातू हर्षल याने रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास चुलत आजोबा असलेल्या नारायण यांचे घर गाठत त्यांच्यावर खंजीराने वार केले. वडीलांवर वार होत असल्याचे पाहून नारायण यांचा मुलगा दिनेश बचावासाठी मध्ये आला असता त्याच्यावरही हर्षलने वार केले.
दोघांवर झालेल्या हल्ल्यात आजोबा नारायण यांचा जागीच मृत्यू झाला तर काका दिनेश हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेची माहीती मिळताच महात्मा फुले चौक पोलीसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान काही तासातच हर्षलला अटक करण्यात पोलीसांना यश आले असून त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात हत्या आणि हत्येचा प्रयत्न करणे आदि गुन्हे दाखल केले आहेत पुढील तपास सुरू असल्याची माहीती सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली.