लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नातीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या व ५ वर्षे तुरुंगात शिक्षा भोगलेल्या ६४ वर्षीय वृद्धाची मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. ज्याच्याशी अल्पवयीन मुलीचे संबंध होते त्याला पाठीशी घालण्यासाठी मुलीने आजोबांवर आळ घेतला.
पीडितेने नोंदवलेली साक्ष विश्वासार्ह नाही, इतकेच काय तर आरोपीविरोधात सबळ पुरावे नाहीत असे स्पष्ट करत सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश कल्पना पाटील यांनी आरोपीला या गुन्ह्यातून दोषमुक्त केले. अल्पवयीन मुलगी ही तिच्या आजी-आजोबांसोबत राहत होती. आजीचा मृत्यू झाला त्यानंतर ती आजोबांसोबत राहत होती. २०१८ साली त्या मुलीला अचानक भोवळ आली व तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिची प्रसूती झाली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
डीएनएही जुळले नाहीत अल्पवयीन मुलीचे ज्या व्यक्तीशी संबंध होते त्याला पाठीशी घालण्यासाठी मुलीने आपल्या आजोबांचे नाव घेतले. आजोबा आपल्याला सिगारेटचे चटके द्यायचे असेदेखील तिने जबानीत म्हटले होते. बाळाचे डीएनए तपासता आजोबा हे आरोपी नसल्याचे सिद्ध झाले. पोलिसांनी मुलीच्या अल्पवयीन साथीदाराला अटक केली. दरम्यान, मुलगी बेपत्ता झाली तेव्हा आजोबांनी ती हरवल्याची तक्रार नोंदवली होती. तसेच, वैद्यकीय अहवालात मुलीच्या सांगण्यानुसार तिला आजोबांनी दिलेले चटके हे सिगारेटचे नसल्याचे उघडकीस आले. हे पाहता आरोपी निर्दोष असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने आजोबांची सुटका केली.