मुंबई : फेसबुक मैत्रीतून परदेशातून महागडी भेटवस्तू पाठविल्याचे आमिष दाखवून अंधेरीतील ७४ वर्षांच्या आजोबांची ५ लाख ३ हजार रुपयांना फसवणूक झाली आहे. अंधेरी परिसरात तक्रारदार जेरू बमन इराणी (७४) राहतात. काही महिन्यांपूर्वी त्यांची फेसबुकवरून कयले रेमंडसोबत मैत्री झाली. त्यानंतर दोघांमध्ये संवाद वाढला. याच संवादातून रेमंडने त्यांना महागडी भेटवस्तू पाठविल्याचे सांगितले. त्यानंतर ती वस्तू दिल्ली विमानतळावर पकडल्याचे सांगून त्यांच्याकडून विविध कारणे सांगून तब्बल ५ लाख ३ हजार रुपये उकळले. त्यांच्या अपेक्षा वाढत असल्याने त्यांना संशय आला. त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.
तसेच अंधेरीतील कौशिककुमार तवेडीया (४४) यांना फेसबुकवरील आरोपी महिलेने १ जानेवारी ते १४ जानेवारीपर्यंत तब्बल १ लाख ८५ हजार रुपयांना गंडविले आहे. त्यांनाही लंडन येथून भेटवस्तू पाठविल्याचे सांगितले. दिल्ली विमानतळावर ती वस्तू कस्टम विभागाने पकडली असून ती सोडविण्यासाठी त्यांच्याकडून हे पैसे उकळण्यात आल्याचे तवेडीया यांनी पोलिसांना सांगितले. पोलीस याचा तपास करीत आहेत.