मुंबई : गुप्तदान देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने वृद्धाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर हात साफ केला आहे. शनिवारच्या या घटनेप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात विक्राेळी पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विक्रोळी पूर्व परिसरात राहणारे ६७ वर्षीय आजोबा १४ जानेवारीला त्यांचा नातू आणि एका मित्रासोबत कांजूरमार्ग येथील डी मार्टमध्ये खरेदीसाठी गेले होते. परत जाताना येथील साईबाबा मंदिराजवळ त्यांना एका अनोळखी व्यक्तीने थांबवले. गुप्तदानासाठी त्यांना मंदिरात नेले. त्या व्यक्तीने पैसे देवाजवळ ठेवून सोबत आणलेल्या पिशवीतील झेंडूची काही फुले काढून त्यावर ठेवली. त्यानंतर त्याने आजोबांना हातातील अंगठ्या, गळ्यातील सोनसाखळ्या काढून त्या फुलांसोबत ठेवा, असे सांगितले. त्यांनी तसे केले. आजोबांनी अंगावरील दागिने त्या ठिकाणी ठेवले. पुढे त्याने हे सर्व सोने उचलून तेथून पाेबारा केला.
दागिन्यांची झाली फुलं... भामट्याने फुले आणि दागिने ठेवलेली नोट पिशवीत टाकल्याचे भासवून ते दागिने लंपास केले. पिशवी आजोबांना देत अर्ध्या तासाने उघडून बघण्यास सांगितली. अगरबत्ती घेऊन येतो, असे सांगून तो पसार झाला. संशय आल्याने आजोबांनी पिशवी तपासली असता त्यात दागिने नव्हते. या प्रकाराने आजोबांना धक्का बसला. त्यांनी बाहेर धाव घेत मित्राला घडलेला प्रकार सांगून पोलिसांत तक्रार दिली.