मुंबई : फेसबुकवरील मैत्रीमुळे ६३ वर्षीय वृद्धेला साडेतीन लाखांचा फटका बसला आहे. याप्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी सायबर ठगांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जोगेश्वरी पश्चिमेकडील रहिवासी असलेल्या ६३ वर्षीय तक्रारदाराने फेसबुकवर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. पुढे गिफ्ट पाठवण्याच्या नावाखाली फेसबुक फ्रेंडने वृद्धेकडून ३ लाख ६० हजार रुपये उकळले. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे.
त्यानुसार, सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत. अनोळखी रिक्वेस्ट आल्यास स्वीकारू नका, आपली गोपनीय माहिती कुणालाही शेअर करू नका, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.
सव्वा कोटीची फेसबुक मैत्रीसोशल मीडियावरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. यातूनच आजारी तसेच आर्थिक अडचण असल्याचे सांगत ५ महिन्यात व्यावसायिकाला सव्वा कोटी रुपयांना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार सायबर विभागाच्या कारवाईत समोर आला आहे. याप्रकरणी उत्तर विभागाच्या सायबर पोलिसांनी दोन महिलांसह तिघांना ऑक्टोबरमध्ये अटक केली आहे.
फेसबुक मैत्रीतून अत्याचारजोगेश्वरीतील एका २२ वर्षीय तरुणीला फेसबुक मैत्री भलतीच महागात पडली आहे. फेसबुक मित्राने तिला पार्टीला बोलवून तिच्यावर बलात्कार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली. याप्रकरणी जोगेश्वरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
फेसबुक मित्रामुळे तरुणीने संपविले आयुष्यफेसबुकवरून मैत्री झाली. पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र प्रियकराने फसवणूक करत संपर्क तोडल्याने तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सांताक्रुझ परिसरात घडली होती. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी ताहा सय्यदविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.