अहमदपूर (जि. लातूर) - स्कुटीवरुन जात असलेल्या आजी व नातवास भरधाव वेगातील कंटेनरने पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे स्कुटीवरील दोघेही खाली पडल्याने कंटेनरखाली चिरडले. ही घटना सोमवारी सकाळी ११.३० वा. च्या सुमारास अहमदपुरातील थोडगा रस्त्यावर घडली.कमलबाई शिवराज गोरे (८०) व योगेश जयराज गोरे (२५) असे मयत आजी व नातवाचे नाव आहे. अहमदपुरातील थोडगा रोडवरुन सोमवारी सकाळी ११.३० वा. च्या सुमारास योगेश गोरे व आजी कमलबाई गोरे हे दोघे स्कुटी (एमएच १२, एलके ४२२२) वरुन दवाखान्यात जात होते. तेव्हा थोडगा गावाकडून अहमदपूरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनर (एमएच ०४, एफएफ ७२६७) ने स्कुटीला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे दोघेही खाली पडून कंटेनरच्या पाठीमागील टायरखाली चिरडले आणि त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.घटनास्थळी अक्षरश: रक्ताचा सडा आणि शरीराचे तुकडे पडले होते. हा अपघात घडल्यानंतर कंटेनर चालक फरार झाला. अहमदपूर पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला. अधिक तपास पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र केदार हे करीत आहेत. मयत आजी व नातवावर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे उपस्थितांचे हृदय हेलावले.
वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर...शहरातील या छोट्या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी असणे गरजेचे आहे. मात्र, अनेक अवजड वाहने धावत असतात. त्यामुळे सदर अपघात घडला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.लॉकडाऊनमुळे योगेश आला होता गावी...मयत योगेश याचे शिक्षण पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये झाले होते. त्याने सन २०२० मध्ये पदवी प्राप्त केली हाेती. सध्या तो नोकरीच्या शोधात होता. लॉकडाऊनमुळे तो गावी आला होता, असे नातेवाईकांनी सांगितले. तसेच योगेशच्या आईचा सन २०१४ मध्ये अपघातात मृत्यू झाला होता. त्याही कंटेनरखाली चिरडून मयत झाल्या होत्या.धक्क्याने वडिलांची तब्येत खालावली...योगेश हा एकुलता एक होता. त्याचे वडील जयराज गोरे यांचे इलेक्ट्रिकचे दुकान असून ते सोमवारी दुकानात होते. अपघाताची माहिती कळताच त्यांची अचानक तब्येत खालावली. त्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. योगेशची बहीण जपानमध्ये राहते.