मध्य रेल्वे मार्गावरील करीरोड रेल्वे स्थानकात एक ६५ वर्षीय महिला आणि तिच्या चार वर्षांच्या नातवाला रेल्वेखाली जाण्यापासून रेल्वेच्या एका कर्मचाऱ्यासह लोहमार्ग पोलिसाने वाचवले. हा सर्व थरार रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
करीरोड रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर ६५ वर्षीय सुजाता चव्हाण या आजी त्यांच्या चार वर्षांच्या नातवाला घेऊन लोकलमधून उतरत होत्या. त्यांचा नातू लोकलमधून फलाटावर उतरला. मात्र, सुजाता चव्हाण उतरत असतानाच लोकल ट्रेन सुरु झाली. यामुळे महिला आणि तिचा नातू लोकलच्या दारातच पडले. लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या गॅपमध्ये जाण्याआधीच त्या ठिकाणी कर्तव्यावर तैनात असलेले लोहमार्ग पोलीस कैलास पठाडे आणि प्लॅटफॉर्मवरुन चालत जात असलेले रेल्वेचे बुकिंग क्लर्क उमानाथ मिश्रा यांनी प्रसंगावधान दाखवत त्यांच्याकडे धाव घेऊन आजी - नातवाला लोकलखाली जाण्यापासून वाचवले. हा सर्व थरार प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.