मुंबई - कांदिवलीत देवदर्शनाला निघालेल्या आजींना लुबाडल्याचा प्रकार कांदिवलीत घडला. यात, चार तोळे सोन्याच्या बांगड्यांवर चोरांनी हात साफ केला. समतानगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद झाली आहे.ठाकूर व्हिलेज परिसरातील नंदादेवी (८०) मंगळवारी मंदिरात जात होत्या. तेव्हा त्यांना ठगांनी अडविले आणि दुसऱ्या साथीदाराकडे नेले. तेथे बोलण्यात गुंतवून त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्यांसह अंगावरील दागिने पिशवीत ठेवण्यास सांगितले आणि हातचलाकीने स्वत:कडे ठेवले. ते निघून गेल्यानंतर नंदादेवी यांनी पिशवी तपासताच, त्यात दागिने नव्हते. त्यांनी घर गाठत हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीयांनी त्यांना पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्या घाबरल्याने तक्रार न देताच त्या निघून गेल्या. अखेर, रविवारी गुन्हा दाखल झाला आहे.