लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची जातीसंबंधीची कागदपत्रे मी तपासली आहेत. त्यांनी धर्मांतर केल्याचे सकृतदर्शनी दिसून येत नाही, असे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी शनिवारी केले.
मुंबई दौऱ्यावर आले असताना वानखेडे यांनी त्यांची भेट घेऊन आपल्यावर होत असलेल्या आरोपांबाबत तक्रार दिली. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, काही लोक कुटुंबावर जातीवरून आरोप करीत असल्याने वानखेडे यांनी आमच्याकडे तक्रार केली आहे. तुम्ही मागसवर्गीय आहात का? असे विचारले असताना त्यांनी हो म्हणून सांगितले, तसेच काही पुरावेही सादर केली आहेत. ड्रग्सच्या विरोधात काम करत आहे, त्याचमुळे काही लोक मला जातीच्या आधारावर माझ्यावर जाणूनबुजून आरोप करत आहेत, असे वानखेडे यांनी सांगितले असल्याचे ते म्हणाले. त्यांच्याशी बोलताना महार जातीचे असल्याचे मला जाणवले. त्यांचा पहिला विवाह स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार झाला होता. त्यांचे रेकॉर्डही मी तपासले. त्यांनी धर्मांतर केलेले नाही. मात्र, आपण एकतर्फी निर्णय देणार नाही, असे सांगून ते म्हणाले, आमच्याकडे त्यांच्या जातीबाबत कोणी तक्रार केल्यास आम्ही त्याची चौकशी करू. या प्रकरणात महाराष्ट्र सरकार काय करते ते पाहू. त्यानंतर राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आपले काम करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, वानखेडे यांनी त्यांची भेट घेऊन सुमारे तासभर चर्चा केली. जात प्रमाणपत्रासह अनेक कागदपत्रे आणि एक निवेदनही हलदर यांना दिले, तर याबाबत वानखेडे यांनी भाष्य करण्यास नकार दिला.
क्रूझवरील प्रकरणाचा तपास एनआयएकडे? विविध आरोपांमुळे वादग्रस्त बनलेली क्रूझवरील ड्रग्जपार्टी प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुद्रा पोर्टवर सापडलेल्या साडेतीन हजार किलो ड्रग्ज प्रकरणाचा तपास एनआयएकडे आहे. कार्डेलिया ड्रग्ज प्रकरणात आंतरराष्ट्रीय तस्करीचा भाग असल्याचे सांगितले जात असल्याने हे प्रकरण एनआयएकडे सोपविले जाईल, त्याबाबत दोन्ही तपास यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची शुक्रवारी चर्चा झाली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.