ग्रेटर नोएडामध्ये एका 70 वर्षीय महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडल्याची घटना समोर आली आहे. महिला घरात एकटीच राहत होती. तर त्यांचा मुलगा आणि सून काही अंतरावर दुसऱ्या घरात राहतात. पण गेली अनेक वर्षे एकट्या राहणाऱ्या आईला भेटायला त्याच्याकडे तेवढा वेळही नव्हता. याच दरम्यान ग्रेटर नोएडातील बीटा-2 पोलीस स्टेशन हद्दीतील बीटा-1 सेक्टरमधील एका घरात अमिया सिन्हा यांचा मृतदेह आढळून आला.
वृद्ध महिला बराच काळ घरामध्ये एकटी राहत होती आणि तिचा घटस्फोटही झाला होता. नोएडाजवळील गाझियाबादमध्ये वृद्ध महिलेचा मुलगा आपल्या कुटुंबासह राहतो. गेल्या 4 महिन्यांपासून महिलेचा मुलगा तिच्याशी फोनवर देखील बोलत नव्हता. दरम्यान, खूप दिवसांनी आईला फोन केला असता, अनेकदा प्रयत्न करूनही फोन बंद असल्याचे सांगतच होते.
मुलगा यानंतर पत्नीसह ग्रेटर नोएडा येथील घरी पोहोचला, मात्र दरवाजा आतून बंद होता. दरवाजा तोडून आत पाहिले असता खोलीत आई पडलेली दिसली. मुलाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि घटनेची माहिती फॉरेन्सिक टीमलाही दिली. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा करून वृद्ध महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मृतदेह 20 ते 25 दिवसांचा असल्याचे सांगण्यात येत असून, त्यातून दुर्गंधी येऊ लागली.
अमिया सिन्हा या महिलेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती वृद्धांसाठी शेल्टर होम उघडण्याबाबत बोलत आहे. मात्र, हा व्हिडीओ बराच जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत महिलेच्या मुलाशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्याने बोलण्यास नकार दिला. या घटनेची माहिती देताना ग्रेटर नोएडाचे एडीशनल डीसीपी अशोक कुमार म्हणाले की, बीटा-2 पोलीस स्टेशन हद्दीतील घरात एका महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"