हरियाणातील फरिदाबाद येथून लग्नाचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. फरिदाबादच्या सेक्टर 9 मधील डॉक्टर मुलीचे लग्न हिसारमध्ये राहणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याच्या मुलासोबत ठरवले होते. गेल्या 25/26 जानेवारीला गोव्यात हा विवाहसोहळा झाला, परंतु बीएमडब्ल्यू कार आणि हुंड्यात काही रोख रक्कम न मिळाल्याने नवरदेवाने वधूला गोवा एअरपोर्टवर सोडून पळ काढल्याच धक्कादायक घटना घडली आहे. ही गोष्ट 27 जानेवारीची आहे. सध्या पीडित वधूच्या तक्रारीवरून फरीदाबादच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वधूने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध हुंडा, मारहाण, अनैसर्गिक लैंगिक अत्याचार आणि इतर अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. नवरदेव अबीर कार्तिकेय नेपाळ विद्यापीठात डॉक्टरचे शिक्षण घेत आहे. त्याच वेळी, अबीरचे आई-वडील आभा गुप्ता आणि अरविंद गुप्ता हिसारमध्ये स्वतःचे हॉस्पिटल चालवतात. डॉक्टर दाम्पत्याने मॅट्रिमोनिअल साइटवर फरिदाबादच्या डॉक्टर मुलीचा बायोडेटा पाहिला आणि मुलीच्या पालकांशी त्यांच्या मुलाच्या लग्नाबद्दल बोलले. यानंतर चर्चा पुढे सरकली आणि नाते पक्के झाले. 26 जानेवारी 2023 रोजी लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली होती.
पीडित मुलीच्या वडिलांचा आरोप आहे की, लग्नाआधी अबीरच्या आई-वडिलांनी 25 लाखांची मागणी केली होती. ती पूर्ण केली. यानंतर मुलीच्या पालकांच्या खर्चाने गोव्यातील एका महागड्या हॉटेलमध्ये विवाह सोहळा पार पाडला. लग्नानंतर अबीरच्या पालकांनी बीएमडब्ल्यू कारची मागणी केल्याचा आरोप वधूच्या वडिलांनी केला आहे. ती मागणी पूर्ण झाल्यावरच वधूला सोबत घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अबीरचे आई-वडील अचानक लग्नस्थळावरून निघून गेले.
अबीर पाठवणीनंतर वधूला सोबत घेऊन आला पण गोवा विमानतळावर सुरक्षा तपासणीनंतर त्याने वधूला सोडले. यानंतर वराने आपला मोबाईल बंद केला. दरम्यान, अबीरची आईही विमानतळावर पोहोचली आणि नववधूकडून दागिन्यांनी भरलेली बॅग हिसकावून पळून गेली. पीडितेच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, अबीर बराच वेळ परतला नाही तेव्हा त्यांच्या मुलीने फोन करून माहिती दिली. त्यानंतर विमानतळावर पोहोचून अबीरचा इकडे-तिकडे शोध घेतला. बराच शोध घेऊनही तो सापडला नाही, तेव्हा विमानतळावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अबीर पळताना दिसला.
काही लोकांच्या मदतीने अबीरला पकडून गोवा पोलिसांकडे तक्रार करण्यात आली, मात्र गोवा पोलिसांनी या प्रकरणात मदत केली नाही. वधूच्या वडिलांनी सांगितले की त्यांनी त्यांच्या लग्नासाठी जवळपास दोन कोटी रुपये खर्च केले आहेत. गोवा पोलिसांकडून न्याय न मिळाल्याने त्यांनी सध्या फरिदाबादच्या सेक्टर 8 पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली आहे. आता समाजातील अशा हुंडा घेणाऱ्या लोकांवर कडक कायदेशीर कारवाई करायला हवी असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"