कानपूर (Kanpur crime News) शहरातील चकेरी भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकाने आपल्याच विद्यार्थीनीला प्रेमात जाळ्यात फसवलं. त्यानंतर तिला लग्नाचं आमिष दाखवलं आणि जेव्हा ती नवरी बनून त्याची वाट बघत होती तेव्हा तिला शिक्षकाने दगा दिला. इतकंच नाही तर तो तिचे दागिने आणि पैसे घेऊन फरार झाला. तो फरार झाल्याचं समजताच तरूणीने शिक्षकाविरोधात पोलिसात तक्रार दिली.
स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती तरूणी
रिपोर्टनुसार, रामादेवी येथील कोचिंग क्लासेस संचालकाने त्याच्या क्लासमधील २४ वर्षीय विद्यार्थीनीला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं. मग लग्नाचं आमिष दाखवलं आणि लग्नाच्या दिवशी अडीच लाख रूपये रोकड आणि दागिने घेऊन तो फरार झाला. तरूणीनुसार, साधारण दोन वर्षांपासून ती कोचिंग क्लासेसमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी जात होती. तेव्हा तिच ओळख कोचिंग क्लासेसच्या संचालकासोबत झाली. नंतर फोनवर बोलू लागले आणि मैत्री प्रेमात बदलली.
भावाला दाखवली गन
आरोपी कोचिंग क्लासेस संचालकाने तरूणीला लग्नाचं स्वप्न दाखवलं होतं. पीडितेने आपल्या परिवारासोबत बोलून या लग्नासाठी तयार केलं. १३ डिसेंबरला त्याचं लग्न ठरलं होतं. तरूणीने सांगितलं की, त्याने गेस्ट हाऊस आणि खाण्या-पिण्याचा खर्च एकत्र करण्यास सांगितलं होतं. गेस्ट हाऊस बुक करण्याच्या नावाने त्याने २ लाख रूपये घेतले. तरूणीने लग्नाच्या पत्रिकाही वाटल्या.
त्यानंतर आरोपीने तरूणीकडून लग्नाचे दागिने बघण्यासाठी मागवून घेतले आणि आपल्याकडेच ठेवले. यानंतर आरोपीने सोमवारी सकाळी पीडितेला फोन काही कामासाठी पैसे मागितले. पीडितेचा भाऊ साधारण ५० हजार रूपये घेऊन गेला. पैसे घेतल्यावर आरोपीने भावाकडे लग्न करत नसल्याबाबत उल्लेख केला. विरोध केला तर आरोपीने तरूणीच्या भावाला बंदूक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली.
आरोपी शिक्षकाने पैसे घेतल्यावर लग्न करण्यास नकार दिला. कसातरी तरूणीच्या भावाने जीव वाचवला आणि त्याने घरी येऊन हा सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर परिवाराने आरोपीला फोन केला तर त्याने लग्न करण्यास स्पष्टपणे नकार दिला. नंतर कुटुंबियांनी गेस्ट हाऊसला जाऊन माहिती काढली तर त्या दिवशी तिथे दुसऱ्याचं लग्न होतं. पोलीस म्हणाले की, तरूणीच्या तक्रारीवरून कारवाई केली जाईल.