उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हमीरपूर जिल्ह्यात लग्नाच्या दिवशीच नवरदेव पळून गेल्याची घटना समोर आली आहे. लग्नाच्या दिवशी नवरदेव दुसऱ्याच तरूणीला घेऊन (Groom run away with other girl on marriage day) पळाला. ज्यामुळे नवरीच्या घरी एकच गोंधळ झाला. त्यानंतर नवरदेवाकडील लोकांनी फोन करून ते वरात आणत नसल्याचं सांगितलं. यासंबंधी तक्रार देण्यासाठी नवरी आणि तिची आई पोलीस स्टेशनमध्ये गेल्या.
हमीरपूर जिल्ह्यातील राठ भागातील पठाणपुरा मुहाल येथे राहणाऱ्या विद्या देवी यांचा पती शिवकुमार यांचं २० वर्षांपूर्वीच निधन झालं होतं. त्यांनी आपल्या दोन मुलींना वाढवण्यासाठी मोलमजुरी केली. मोठी मुलगी उषाचं लग्न चार वर्षाआधीच केलं होतं. तर लहान मुलगी २० वर्षीय अनीताचं लग्न कानपूर नगरच्या दर्शनपुरवामध्ये ठरलं होतं.
अनीताचं लग्न दर्शनपुरवा येथील राहुल वर्मासोबत जुळवण्यात आलं होतं. १० मे रोजी वरात येणार होती. ज्यासाठी दोन्ही घरात सर्व तयारी पूर्ण झाली होती. लग्नात सहभागी होण्यासाठी नातेवाईकही आले होते. रविवारी घरातील मंडपात रितीरिवाज होणार होते. हळदीच्या कार्यक्रमात संगीत वाजत होतं. तेव्हाच नवरदेवाच्या नातेवाईकांनी फोन करून वरात आणणार नसल्याचं सांगितलं.
ऐनवेळी वरात आणण्यास नकार दिल्याने सगळे लोक हैराण झाले. नवरीची आई विद्या देवी यांनी सांगितलं की, नवरदेवाचा भाऊ अनिलने फोन माहिती दिली की, राहुल दुसऱ्या मुलीसोबत पळून गेला. त्यामुळे ते वरात आणू शकत नाही आणि त्याने फोन बंद केला.
मुलीला घेऊन आई पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि त्यांनी तक्रार दाखल केली. दोघींनी तक्रार दाखल करत पोलिसांकडे न्यायाची मागणी केली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तक्रार दाखल करून घेतली आहे आणि लवकरच कारवाई केली जाईल.