मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्ताने मुंबईकर मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. अशात बाहेर जाण्यापूर्वी घराचीही काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. याच सुट्टीत बंद घर म्हणजे चोरट्यांसाठी रान मोकळे असते. त्यामुळे एप्रिलपाठोपाठ मे महिन्यात घरफोडी, चोरीचे प्रमाण अधिक आहे. कारण सुट्टीच्या काळात परराज्यांतून टोळ्या मुंबईत तळ ठोकून असतात, हे यापूर्वीच्या कारवायांतून वेळोवेळी समोर आले आहे.मुंबईत गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीच्या तुलनेत यंदा उन्हाळी सुट्टीच्या काळात घरफोडी, चोऱ्यांचा आकडा कमी असला तरी त्याचे प्रमाण तितकेच चिंताजनक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये मुंबईत एप्रिलमध्ये २३२ घरफोडीचे तर मेमध्ये हाच आकडा ३१४ वर पोहोचला. गेल्या वर्षी मे महिन्यात १६५ घरफोडीच्या घटनांची नोंद झाली. यापैकी अवघ्या ३४ गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले. अनेकदा घरफोडी करणाऱ्यांमध्ये परराज्यातील टोळीचा समावेश अधिक असतो. ही मंडळी बंद घरांचा माग काढत, घरफोड्या करतात. अनेकदा घरातील व्यक्ती परतल्यानंतरच चोरी झाल्याचे उघडकीस येते. पण, तोपर्यंत ही मंडळी चोरीचे दागिने, पैसे घेऊन पसार झालेली असतात. अनेकदा ही मंडळी सराफाचे दुकान, बंगला यांच्या शेजारी भाड्याने घर घेऊन राहतात. तर, काही जण फेरीवाले बनून बंद घर, दुकानांचा आढावा घेतात. त्यानंतर संधी साधून घरातील किमती ऐवजावर हात साफ करतात. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचताना पोलिसांनाही अडचणी निर्माण होतात. त्यामुळे पोलिसांवर खापर न फोडता, नागरिकांनी स्वत: सतर्क राहून घराची काळजी घेणे गरजेचे आहे.अशी घ्या काळजी...घराबाहेर जाताना सोन्याचे दागिने तसेच रोकड घरात ठेवू नये. दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावेत.रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना घरातील दिवे चालू ठेवावेत.रात्रीच्या वेळी वस्तीमध्ये कोणी अनोळखी संशयितपणे फिरताना नजरेस पडल्यास पोलिसांना कळवावे.घराच्या किंवा सोसायटीच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे तसेच सायरनचा वापर करावा.
उन्हाळ्याच्या सुट्टीत घरफोड्यांमध्ये होतेय वाढ!, मुंबईकरांच्या सुट्टीवर चोरट्यांची मजा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 3:28 AM