तीन वर्षांपूर्वी - म्हणजेच २०१६ मध्ये आंध्र प्रदेशच्या रणजी संघातील एक तरुण क्रिकेटपटू चांगलाच प्रकाशझोतात आला होता. सलग ८२ तास क्रिकेट खेळणाऱ्या या वीराचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं गेलं होतं. ते नाव होतं, बी नागराजू. हे नाव पुन्हा चर्चेत आलंय, पण यावेळी ते पराक्रमासाठी नव्हे, तर त्यानं केलेल्या 'प्रतापां'मुळे. बीसीसीआयचे निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांच्या नावाने अनेक उद्योगपतींची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी नागराजूला अटक केली आहे.
नागराजूनं ट्रू-कॉलरवर स्वतःचा मोबाईल नंबर एमएसके प्रसाद या नावाने रजिस्टर केला होता. त्याला प्रसाद यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करता येत होती. त्याचाच वापर करून नागराजूनं काही उद्योजकांना जवळपास ५ लाख रुपयांना गंडा घातला. आपल्या नावाचा कुणीतरी गैरवापर करत असल्याचं एमएसके प्रसाद यांच्या लक्षात येताच, त्यांनी २५ एप्रिल रोजी या संदर्भात विजयवाडा सायबर क्राइम पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर, वेगाने तपास करत पोलिसांनी नागराजूला बेड्या ठोकल्या.
दरम्यान, २०१६ मध्ये विशाखापट्टणम येथील एएस राजा कॉलेज ग्राउंडवर नागराजूनं ८२ तास फलंदाजी करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानं तब्बल २५ हजार चेंडूंचा सामना करून पुण्याच्या क्रिकेटपटूचा ५० तासांचा विक्रम मोडला होता. या विक्रमानंतर एका पुरस्कार सोहळ्यात नागराजू आणि एमएसके प्रसाद एकमेकांना भेटले होते.