गुजरातमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना-मुख्यमंत्री अमृतम (PMJAY-MA) योजनेचा गैरवापर केल्याप्रकरणी सात रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली आहे. अहमदाबादमधील एका खासगी रुग्णालयात या योजनेच्या दोन लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा मृत्यू गरज नसताना केलेल्या अँजिओप्लास्टीमुळे झाला होता.
गेल्या वर्षभरापासून केंद्राच्या योजनेचा अशाच प्रकारे गैरवापर होत असल्याचं समोर आलं आहे. अशा परिस्थितीत योजनेच्या यादीतून सात रुग्णालयं किंवा क्लिनिक वगळण्यात आले आहेत. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यात म्हटलं आहे की, खयाती हॉस्पिटलने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना-मुख्यमंत्री अमृतम योजनेंतर्गत अनावश्यक शस्त्रक्रिया करून बेकायदेशीरपणे आर्थिक लाभ मिळवला आहे.
शासनाकडून रुग्णालयाच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही केवळ PMJAY योजनेशी संबंधित फसवणूक नाही. १३ नोव्हेंबर रोजी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव धनंजय द्विवेदी म्हणाले होते की, गेल्या वर्षी SAFU ने ९५ रुग्णालयांना भेट दिली होती. यापैकी बहुतांश ठिकाणी अनियमितता आढळून आल्याने २० कोटींचा दंड ठोठावण्यात आला. १०२४ लाभार्थ्यांकडून अवैधरित्या घेतलेले ४४ लाख रुपयेही परत करण्यात आले.
सात रुग्णालयं आणि चार डॉक्टरांनी एवढी फसवणूक केल्याचं राज्य सरकारच्या निदर्शनास आलं की त्यांना या योजनेतून काढून टाकावं लागलं. त्यांना मोठा आर्थिक दंडही ठोठावण्यात आला. त्यांच्या या अनियमिततेमुळे तिजोरीचं ८.९४ कोटी रुपयांचं नुकसान झालं.
या रुग्णालयांनी अनावश्यक हार्ट सर्जरी केल्या आणि रेप्चर्ड यूट्रस अँड असिस्टेड वजायनल डिलिव्हरी केली. निरोगी बालकांना खोट्या स्वाक्षऱ्या आणि शिक्के वापरण्यात आले. रुग्णांकडून अवाजवी फी वसूल केली. पायाभूत सुविधांचा अभाव सांगून पैसे उकळले. रेडिएशन पॅकेजच्या नावावर पैसे गोळा केले आहेत.