Gujarat AAP: गुजरात आम आदमी पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मनोज सोरठिया यांच्यावर मंगळवारी संध्याकाळी सुरतच्या सरथाना सिमाडा भागात हल्ला झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सोरठिया सुरत शहरातील आम आदमी पार्टीच्या मुख्य कार्यालयाजवळील चौकात पक्षाने आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आले होते, तेव्हा कारमधून आलेल्या काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला भाजपाने घडवून आणल्याचा आरोप आपकडून करण्यात आले आहे.
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी दोषींना कठोर शिक्षा द्यावी: केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून विरोधी पक्षांच्या लोकांवर अशाप्रकारे हल्ला करणे योग्य नाही, असे मत नोंदवले. निवडणुकीत हार-जीत होतच असते, पण विरोधकांना हिंसेने चिरडून टाकणे हे गुजरातच्या संस्कृतीविरुद्ध आहे आणि लोकांना ते आवडत नाही. मी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की, दोषींना कठोर शिक्षा द्यावी आणि सर्वांना संरक्षण द्यावे, असेही ट्वीट त्यांनी केले.
'आप'च्या लोकप्रियतेने भाजपा अस्वस्थ असल्याचा पक्षाचा दावा
आम आदमी पक्षाकडून या हल्ल्याच्या घटनेबद्दल ट्विट करण्यात आले आहे. गुजरातमधील आम आदमी पक्षाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे घाबरलेल्या AAP गुजरातचे सरचिटणीस मनोज सोरठिया यांच्यावर सुरतमध्ये भाजपच्या गुंडांनी हल्ला केला, असा दावा पक्षाने केला आहे.