अहमदाबाद: गुजरात निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी असलेल्या सीआरपीएफ जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. जवानांसोबत झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
पोरबंदरमध्ये ही घटना घडली. पोरबंदरचे कलेक्टर ए एम शर्मा यांनी सांगितले की, सर्व जवान हे मणिपूरच्या सीआरपीएफ बटालियनचे आहेत. डिसेंबरच्या सुरुवातीला गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याच्या बंदोबस्तासाठी निवडणूक आयोगाकडून या जवानांना पाठविण्यात आले आहे.
पोरबंदर जिल्ह्यात १ डिसेंबरला मतदान होणार आहे. हे जवान पोरबंदरपासून २५ किमी दूरवरील टुकडा गोसा गावातील मतदान केंद्रात राहत होते. या केंद्राचा वापर सध्या त्यांच्या राहण्यासाठी केला जात होता.