सूरत: गुजरातच्या वलसाडमध्ये एका तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाला आहे. साखरपुडा झाल्यानंतर तरुण लिव्ह-इनमध्ये राहत होता. साखरपुडा झालेल्या तरुणीसोबत लग्न करण्यास त्यानं नकार दिला. त्यामुळे तरुणीच्या कुटुंबियांनी पंचायतीत धाव घेतली. यानंतर ग्रामस्थांनी तरुणाला बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला.
वलसाडमधील आसलोना गावात वास्तव्यास असलेल्या संजय भुसरा (वय २० वर्षे) या तरुणाचा रविवारी मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. तीन वर्षांपूर्वी संजयचा साखरपुडा झाला होता. त्या तरुणीसोबत तो गेल्या वर्षभरापासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होता. तरुणीच्या कुटुंबियांनी संजयला लग्न करण्यास सांगितलं. मात्र त्यानं नकार दिला. त्यामुळे त्यांनी पंचायतीमध्ये धाव घेतली.
तरुणीचे वडील लक्ष्मण यांनी पंचायतीला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही ग्रामस्थ संजयला मारहाण करताना दिसत आहेत. त्यादरम्यान संजय एका खड्ड्यात पडला. त्यानंतरही गावातील तरुण त्याला मारत राहिले. काहीजणांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
या प्रकरणी पोलिसांनी लक्ष्मण गवळी, उत्तम गवळी, छगन गवळी, रमण गवळी, सीताबाई गवळी, सुनील गवळी आणि मधू गवळी यांना अटक केली आहे. संजयचे वडील आनंद भुसरा यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.