अहमदाबाद : गुजरात निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. असे असताना रात्रीच काँग्रेस आमदाराला मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे याविरोधात काँग्रेस समर्थकांनी दुकानाला आग लावली, तसेच अग्निशमन दलाच्या गाडीची देखील तोडफोड करण्यात आली आहे.
शनिवारी नवसारी जिल्ह्याचील खेरगाममध्ये काँग्रेस आमदार आणि आदिवासी नेता अनंत पटेल यांच्यावर काही लोकांनी हल्ला केला. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. याची बातमी पसरताच पटेल समर्थकांनी मोठी गर्दी केली. संतप्त कार्यकर्त्यांनी एका दुकानाला आग लावली. तसेच तोडफोड देखील केली आहे.
अनंत पटेल यांच्यावर जिल्हा पंचायतच्या अध्यक्षाने हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. मी जेव्हा खेरगामला सभेसाठी पोहोचत होतो, तेव्हा तेथील जिल्हा पंचायतच्या अध्यक्षाने आणि त्यांच्या गुंडांनी माझ्या कारची तोडफोड केली व मला मारहाण केली. तू आदीवासी असून नेता व्हायला बघतोयस, तुला सोडणार नाही. एका आदिवासीला येथे मोठा होऊ देणार नाही, अशी धमकी दिल्याचे पटेल म्हणाले.
हल्ल्यानंतर पटेल हे धरणे आंदोलनाला बसले. जोपर्यंत त्या जिल्हा पंचायतच्या अध्यक्षाला आणि त्याच्या गुंडांना अटक होत नाही तोवर आम्ही आंदोलन करत राहणार, असे पटेल म्हणाले. तोपर्यंत १ ४ जिल्ह्यांचे राज्य मार्ग आम्ही आदिवासी बंद करून टाकणार आहोत. भाजपा सरकारविरोधात जो आवाज उठवितो त्याला मारले जाते, तुरुंगात पाठविले जाते, असा आरोपही त्यांनी केला आहे.