गुजरातमधील जीएमईआरएस मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये शनिवारी एका एमबीबीएस विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. विद्यार्थ्याच्या मृत्यूमागे सीनियर्सनी केलेलं रॅगिंग हे कारण असल्याचं म्हटलं जात आहे. अनिल मेथानिया हा धारपूर पाटण येथील जीएमईआरएस मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे एमबीबीएसच्या फर्स्ट ईअरचा विद्यार्थी होता.
शनिवारी रात्री महाविद्यालयाच्या निवासी परिसरात इंट्रोडक्शन करताना सीनियर्सकडून त्याचं रॅगिंग, छळ करण्यात आला. अनिलचं रॅगिंग करताना अनेक तास त्याला उभं केलं होतं. त्यानंतर अनिल खाली पडला आणि बेशुद्ध झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्याने पोलिसांना त्याला तीन तास उभं केल्याचं सांगितलं. यानंतर काही वेळातच अनिलचा मृत्यू झाला.
या प्रकरणी १५ सीनियर विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिलचा भाऊ गौरव मेथानिया म्हणाला, मला शनिवारी रात्री फोन आला होता. आम्हाला सांगण्यात आलं की, माझ्या भावाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आम्हाला लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचा असाही मेसेज दिला.
गौरव पुढे म्हणाला, कुटुंबातील चार सदस्य पहाटे चार वाजता रुग्णालयात पोहोचले. तेव्हा माझ्या भावाचा मृत्यू झाला असून त्याला पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलं आहे असं सांगितलं. यानंतर, आम्हाला कॉलेजचे डीन आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून समजलं की, अनिलचं रॅगिंग केलं होतं आणि त्याच्या सीनियर्सकडे याबाबत चौकशी केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.