राजकोट : दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली असतानाही देशात बलात्काराचे गुन्हे घडत आहेत. तुरुंगात बलात्कारच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या आरोपीनेच पॅरोलवर घरी येत आणखी एका मुलीला पळवून नेल्याची घटना घडली आहे. यामुळे नव्या कायद्याच्या धाकाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पेशाने शिक्षक असलेल्या धवल त्रिवेदी याला 23 मार्चला एका बलात्काराच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्याला 28 जुलै रोजी 15 दिवसांची संचित रजा मिळाली होती. त्याच्या रजेचा शवटा दिवस 12 ऑगस्ट होता. मात्र, धवल 11 ऑगस्टलाच एका मुलीला घेऊन पळून गेला. मुलीच्या वडिलांनी याबाबत धवलने मुलीला फूस लावून पळवून नेल्याची पोलिसांत तक्रार दिली आहे.
धवल पॅरोलच्या रजेवर आल्यानंतर त्याची हत्येच्या आरोपांत जामिनावर असलेल्या जयदीप धांधल याच्याशी ओळख झाली. जयदीप याने एका भाड्याच्या गाळ्यामध्ये इंग्लिश स्पिकिंग क्लास सुरु केला होता. धवलने याठिकाणी धमेंद्र सर या नावाने शिकवायला सुरुवात केली. त्याच्यासोबत पळून गेलेली मुलगी याच क्लासमध्ये शिकायला येत होती.
पोलिसांनी तपासावेळी या क्लासजवळच्या सीसीटीव्ही फुटेजची चाचपणी केली. त्यात धमेंद्र सरच धवल असल्याचे समोर आले. या मुलीशिवाय या क्लासमध्ये आणखी 9 मुली येत होत्या. मात्र, धवल या मुलीलाच एक तास आधी बोलावत होता. अखेर तो या मुलीला पळवून नेण्यात यशस्वी झाला.
धवल याच्यावर याआधी 11 वीच्या मुलीचे अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा आहे. त्याला 2014 मध्ये पंजाबमधून अटक करण्यात आली होती.