कच्छ - गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील सागरी किनारी भागात एका खाडीतून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या या बॅगांमध्ये तब्बल 250 कोटी रुपयांचं हेरॉइन सापडलं आहे. गुजरातएटीएसने (ATS) सोमवारी यासंदर्भात माहिती दिली. सीमा सुरक्षा दल (BSF) आणि पोलिसांनी रविवारी जखाऊजवळ 49 बॅग जप्त केल्या होत्या. हे हेरॉईन पाकिस्तान तस्करांकडून फेकण्यात आल्याचंही एटीएसने स्पष्ट केलं आहे.
तटरक्षक दल आणि एटीएसनं याअगोदर 30 मे रोजी अरबी समुद्रातून भारतीय सीमेअंतर्गत सात पाकिस्तानी नागरिकांना अटक केली होती. 'गुजरातमध्ये अंमली पदार्थाची तस्करीच्या योजना आखणाऱ्या तस्करांसंबंधित मिळालेच्या सूचनेवरुन, बोटीचा कॅप्टन मोहम्मद अक्रम याने तटरक्षक दलाचे जहाज जवळ येताच दोन पिशव्या समुद्रात फेकून दिल्या होत्या, अशी माहिती गुजरात एटीएसचे पोलीस उपअधीक्षक बी. पी. रोझिया यांनी दिली. तटरक्षक दल आणि एटीएसने 30 मे रोजी अल नोमान या पाकिस्तानी बोटीसह सात जणांना अटक केली आहे.
दरम्यान, एटीएसने हस्तगत केलेल्या 49 बॅगमध्ये सुमारे 50 किलो हेरॉईन होतं. या प्रत्येक पॅकेटचं वजन जवळपास 1 किलो होते. या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 250 कोटी रुपये आहे, अशी माहितीही रोझिया यांनी दिली.