Guna Gangrape: 'तुमची मुलगी खोलीत बेशुद्धावस्थेत पडलीय'; बाप शोधत शोधत पोहोचताच सात रेपिस्ट पळाले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 10:25 AM2022-10-30T10:25:37+5:302022-10-30T10:26:05+5:30
नागरिकांच्या विरोधानंतर जिल्हा प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली असून तिघांच्या घरी नोटीस पाठवून बेकायदा बांधकाम असेल तर त्यावर तोडकामाची कारवाई करण्यात येणार असल्याचे यात म्हटले आहे.
मध्ये प्रदेशच्या गुनामध्ये १५ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्याहून धक्कादायक म्हणजे बलात्कारानंतर अज्ञाताकडून मुलीच्या वडिलांना फोन करून तुमची मुलगी एका गल्लीतील खोलीत बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती फोन करून देण्यात आली. या प्रकारामुळे त्या गावातील ग्रामस्थ संतप्त झाले असून आजी-माजी आमदारांनी आरोपींवर कारवाईसाठी रस्ता जाम केला होता.
सात आरोपींपैकी चार जण हे अल्पवयीन आहेत. पोलिसांनी पोस्कोनुसार विविध गुन्ह्यांखाली पाच आरोपींना अटक केली आहे. मुलीच्या वडिलांसह काही स्थानिकांनी तिला एका सुनसान घराच्या खोलीत बेशुद्धावस्थेत पाहिले. यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी साडे तीन तास रस्ता जाम करून ठेवला होता. पिडीत मुलीने सामुहिक बलात्काराची तक्रार केली आहे. पोलीस मेडिकल रिपोर्टची वाट पाहत आहेत.
'माझी मुलगी सकाळी 10 वाजता शाळेत गेली होती. सायंकाळपर्यंत ती घरी न परतल्याने तिची आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध सुरू केली. त्यानंतर अचानक एका व्यक्तीचा फोन आला आणि तुमची मुलगी बिनागंज येथील एका वस्तीच्या खोलीत बेशुद्ध पडल्याचे सांगितले. मी तेथे पोहोचल्यावर आरोपी तेथून पळून गेले', असे पिडीतेच्या वडिलांनी माध्यमांना सांगितले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोघांची ओळख विवेक मीणा आणि मोहित मीणा अशी आहे. नागरिकांच्या विरोधानंतर जिल्हा प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली असून तिघांच्या घरी नोटीस पाठवून बेकायदा बांधकाम असेल तर त्यावर तोडकामाची कारवाई करण्यात येणार असल्याचे यात म्हटले आहे.
ग्रामस्थांच्या आंदोलनामध्ये चाचौडाचे आमदार लक्ष्मण सिंह, भाजपाच्या माजी आमदार ममता मीणा देखील होत्या. सिंह म्हणाले की, पिडीतेने सात आरोपींची नावे घेतली आहेत. परंतू पोलिसांनी पाचच जणांना अटक केली आहे. पिडीतेला ड्रग्ज देण्यात आले होते, यामुळे ती खूप वेळ बेशुद्ध होती.
शहरातील अनेक महिला व मुलींनी स्थानिक एसडीए कार्यालय गाठून आरोपींच्या मालमत्ता पाडून सार्वजनिक परेड करण्याची मागणी केली. माजी मुख्यमंत्री आणइ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनीही या घटनेचा निषेध केला आहे.