"तू घाबरू नकोस, मी येतेय", पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पत्नीचं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 18:05 IST2025-01-09T18:05:04+5:302025-01-09T18:05:55+5:30
एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

"तू घाबरू नकोस, मी येतेय", पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पत्नीचं टोकाचं पाऊल
मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे गीता नावाच्या महिलेने पतीच्या निधनानंतर आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, याआधीही गीताने एकदा नाही तर दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता पण ती वाचली. शेवटी, गीताने तिसऱ्यांदा विष प्राशन करून आपलं जीवन संपवलं.
मुकेश राजपूत (३२) यांचं ३ जानेवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. पत्नी गीता पतीच्या मृत्यूने व्यथित झाली होती. तसेच आपल्या पतीच्या मृत्यूनंतर, गीता, मृतदेहाजवळ बसून म्हणाली होती, "तू घाबरू नकोस, मी येतेय". गीताने प्रथम गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण ती वाचली.
२०१९ मध्ये झालं लग्न
दुसऱ्यांदा गीताने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण ती पुन्हा वाचली. पण तिसऱ्यांदा तिने विष प्राशन केलं. विष प्राशन केल्यानंतर गीताला शिवपुरी मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी रेफर करण्यात आलं. पण गीता उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गीता आणि मुकेश यांचं लग्न २०१९ मध्ये झालं होतं.
मुकेश त्याच्या पत्नीसोबत रामगडा गावात राहत होता. दोघांनाही दोन मुली आहेत. एक २ वर्षांची आणि दुसरी ४ महिन्यांची आहे. पती मुकेशच्या निधनानंतर गीता बेशुद्ध पडली. मृतदेहाजवळ बसून ती फक्त एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत होती, "घाबरू नकोस, मी येतेय". शेवटी गीता तिच्या पतीकडे निघून गेली.