लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: कोथरुडमधील शास्त्रीनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या बॅनरवर फोटो न लावल्याने तलवारीने राडा घालून दहशत निर्माण करणारा गुंड व त्याच्या साथीदाराला गुन्हे शाखेच्या पथकाने पवना धरणामागील तुंगी गावाच्या डोंगरावर पकडले. कोणतेही वाहन जात नसल्याने मुख्य रस्त्यापासून दूर डोंगरात पावसा पाण्यात चिखल, ओढे ओलांडून हे पथक डोंगरावर पोहचले. तेथे लपवून बसलेल्या या दोघांच्या मुसक्या आवळल्या.
ओंकार ऊर्फ आबा शंकर कुडले (रा. सागर कॉलनी, कोथरुड) आणि अशोक बाळकृष्ण कळजकर (रा. शास्त्रीनगर, कोथरुड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या बॅनरवर फोटो लावला नाही, म्हणून ओंकार कुडले याने तलवार घेऊन हवेत फिरवून व दगड स्टेजवर फेकले. तलवारीने साऊंड सिस्टीम ऑपरेटरवर वार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने शास्त्रीनगरमध्ये एकच तणाव निर्माण झाला होता. स्वत: पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी मध्यरात्री कोथरुड पोलिस ठाण्याला भेट देऊन घटनेची माहिती घेतली होती. पोलिसांनी तो पवना धरणाजवळील डोंगराळ भागात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर हे सहकार्यांसह रवाना झाले. या पथकाने डोंगर दर्यां, ओढे पार करत डोंगरावर जाऊन या दोघांना पकडले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील, हवालदार शितल शिंदे, संजय आढारी, किरण ठवरे, पोलिस अंमलदार विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, अशोक शेलार, अमोल वाडकर, वैभव रणपिसे, मनोज सांगळे, शंकर संपते, पोलिस मित्र सुधीर सोनवणे, राजेंद्र मारणे, सचिन आहिवळे, धनंजय ताजने यांनी ही कामगिरी केली.