राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाप्रकरणानंतर गुणरत्न सदावर्तेंविरोधात सुरु झालेले शुक्लकाष्ट काही संपण्याचे नाव घेत नाहीय. सातारा पोलिसांनी अटक केल्यानंतर सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या सदावर्तेंना आता कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अँड. गुणरत्न सदावर्ते याच्या अटकेसाठी कोल्हापुरातील शाहुपुरी पोलिसांचे विशेष पथक मंगळवारी सकाळी मुंबईत दाखल झाले होते. तर त्यांना अटकपूर्व जामिन मिळावा यासाठी कोल्हापुरातील न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. परंतू याची सुनावणी लांबणीवर पडल्याने आणि त्यातच सातारा पोलिसांनी केलेल्या अटकेनंतर सातारा न्यायालयाकडून जामीन मिळाल्याने कोल्हापूर पोलिसांचा मार्ग मोकळा झाला होता.
सकल मराठा क्रांती मोर्चाचे कोल्हापुरातील समन्वयक दिलीप पाटील यांनी अँड. गुणरत्न सदावर्ते याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. अँड. सदावर्ते यांनी विविध मार्गांनी पैसे जमवून ते मराठा आरक्षणविरोधी न्यायालयीन प्रक्रियेसाठी खर्च केले, पण त्याचा हिशेब दिला नसल्याचा पाटील यांनी आरोप करून त्यांच्या सर्व कारभाराच्या चौकशीची मागणी केली आहे. मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मराठा आणि मागासवर्गीय समाज यांच्या तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. चिथावणीखोर वक्तव्य करून सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण करण्याचा सदावर्तेंनी प्रयत्न केला असल्याचेही दिलीप पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
कोल्हापूर पोलिसांनी सदावर्ते यांना आर्थर रोड जेलमधून ताब्यात घेतले आहे. रात्री उशीरापर्यत त्यांना कोल्हापूरात आणण्यात येणार आहे. गिरगाव न्यायालयाने हा ताबा देण्याचे आदेश दिले. दरम्यान, त्याच न्यायालयात ताबा मिळण्यासाठी अकोट पोलिसांनीही अर्ज केला आहे. सदावर्तेचा ताबा घेऊन पोलीस बंदोबस्तात कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले. तो रात्री उशीरापर्यत कोल्हापूरात पोहचण्याची शक्यता आहे.