गुरुग्राम: कौटुंबिक वाद आणि बेरोजगारीला कंटाळून एका तरुणानं चाकूनं भोसकून आईची हत्या केली आहे. आई नेहमीप्रमाणे इंजिनीयर मुलाला त्याच्या घरी जेवण द्यायला गेली होती. त्यानंतर दोघे रस्त्यात बागेजवळ उभे राहून बोलत होते. त्यादरम्यान तरुणानं आईवर चाकूनं वार केले. त्यानंतर तो तिथून पळून गेला.
जखमी अवस्थेत ६६ वर्षीय महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. गुरुवारी रात्री शिवपुरी वसाहतीत ही घटना घडली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मुलगा उपाशी राहू नये म्हणून आई त्याला दररोज जेवण घेऊन जायची. त्याच आईला मुलानं चाकूनं वार करून संपवलं. मुलगा हल्ला करत असताना आई गयावया करत होती. मला कशाला मारतो आहेस, मला मारू नको, मी तुझी आहे, अशा शब्दांत आईनं गयावया केली. पण मुलाच्या पाषाणरुपी मनाला पाझर फुटला नाही.
मुलगा मनिष भंडारी बीटेक केल्यानंतर एका प्रख्यात कंपनीत काम करत होता, असं रणवीर कुमार भंडारी यांनी सांगितलं. रणवीर भंडारी २०१३ मध्ये रेल्वेतून निवृत्त झाले. मनीष आणि त्याची पत्नी श्वेता कौटुंबिक वादामुळे वेगळे झाले. त्यानंतर श्वेता मुलासोबत सेक्टर १८ मधील इमारतीत राहायची. लॉकडाऊनमध्ये मनिषची नोकरी गेली. सप्टेंबर २०२१ मध्ये मनिष आई वडिलांपासून राहू लागले. त्याचं घर आई वडिलांच्या घरापासून थोड्या अंतरावर आहे.
मनिषची आई वीणा त्याच्यासाठी रोज जेवण घेऊन जायची. गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास वीणा मनिषसाठी जेवण घेऊन गेल्या होत्या. बराच वेळ त्या घरी न परतल्यानं पती त्यांना शोधण्यासाठी निघाले. तेव्हा शिव वाटिकेजवळ वीणा आणि मनिष बोलताना त्यांना दिसले. आम्ही बोलतोय, तुम्ही घरी जा, असं वीणा यांनी पतीला सांगितलं. त्यानंतर रणवीर घरी परतले. थोड्याच वेळात रस्त्यावर आरडाओरड झाली. रणवीर बागेजवळ पोहोचले. त्यावेळी वीणा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. आसपासच्या लोकांच्या मदतीनं रणवीर यांनी वीणा यांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.