वसई - बंदी असूनही वसई विरार शहरात मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री होत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई कक्षाने कारवाई करून एक कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक कऱण्यात आली आहे.
वसई विरार शहरात बेकायदेशीरपणे गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाही होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई कक्षाने विरारच्या खानिवडे टोलनाका येथे सापळा लावला होता. या कारवाईत पोलिसांनी एक ट्रक (एमएच ०४ सीपी ४६४२) आणि एक टेम्पो (एमएच ०४ सीपी ५७७२) जप्त केला. ट्रकमध्ये विमल गुटखा कंपनीचे ७५ गोणी आणि १५२ खोकी आढळली. तर टेम्पोमध्ये विमल गुटखा आणि तंबाखूच्या १५९ गोणी आढळल्या आहेत. पोलिसांनी आरोपी ट्रकचालक आणि टेम्पोचालकांना अटक केली आहे. या कारवाईत एकूण १ कोटी ५ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाला कळविण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस उपनिरीक्षक हिंतेंद्र विचारे यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींनी हा गुटखा कुठून आणला आणि तो कोणाला विकणार होते त्याचा पोलीस शोध घेत आहेत.