मुंबई - गुन्हे शाखेला कुख्यात गुरु साटमच्या आर्थिक नाड्या आवळण्यात यश आले असून हॉंगकॉंगमधून त्याचे आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या म्हणजेच हवाला ऑपरेटर कृष्णकुमार बाळकृष्ण नायर उर्फ केविनला अटक करण्यात खंडणीविरोधी पथकाला यश आले आहे. त्याच्या अटकेसाठी सहा महिन्यांपासून गुन्हे शाखा मोहिम राबवत होती. अखेर केरळ येथे आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
मुंबईतील एका व्यावसायिकाला खंडणीची मागणी केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुख्यात गुंड गुरू साटमचे खंडणीचे सर्व पैसे हवाला मार्फत हॉंगकॉंमध्ये केविनकडे दिले जात होते. तेथून तो पुढे ही सर्व रक्कम गुरू साटमपर्यंत पोहचवत होता. तक्रारदार व्यावसायिकाला गेल्या चार वर्षांपासून गुरू साटम धमकावून खंडणी घेत होता. तक्रारदारावर यापूर्वी दुसऱ्या टोळीकडून गोळीबार झाल्यामुळे तो घाबरून साटमला नियमीत खंडणीची रक्कम देत होता. असे त्याने आतापर्यंत 60 लाखांची रक्कम दिली होती. मात्र, वारंवार होणाऱ्या त्रासामुळे त्याने याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार केली. आरोपींना मुंबईतील आणखी दोन व्यावसायिकांवर गोळीबार करण्याचे आदेश साटमने दिले होते. पण पोलिसांनी वेळीच कारवाई करून त्यांना रोखले होते. त्याप्रकरणी केविनचेही नाव पुढे आले होते. त्यानुसार त्याच्याविरोधात एलओसी जारी करण्यात आले होते. त्याची कुणकुण केविनला लागल्यानंतर त्याने दुसरा पासपोर्ट बनवून घेतला.
तेव्हापासून केविनवर गुन्हे शाखेचे पोलीस लक्ष ठेऊन होते. तो हॉंगकॉंगवरून निघाल्याची माहिती मिळाल्यानंतर केरळच्या त्रिवेंद्रम विमानतळाला याबाबत माहिती देण्यात आली होती. मात्र, केविन दुसऱ्या पासपोर्टवर तेथे आल्यामुळे सुरूवातीला स्थानिक यंत्रणांना त्याच्यावर संशय आला नाही. पण पासपोर्ट क्रमांक सोडल्यास इतर सर्व माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीशी मिळती जुळती असल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे पथक तात्काळ तेथे पोहोचले आणि त्यांनी ओळख पटवून केविनला ताब्यात घेतले. त्याला मंगळवारी मुंबईत आणून खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.