मुंबई-
गुटखा उद्योजक जेएम जोशी याला मुंबईच्या विशेष न्यायालयानं १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसंच पाच लाख रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. जेएस जोशी यानं अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला मदत केल्याचा आरोप आहे. दाऊदच्या मदतीनं त्यानं २०२२ साली पाकिस्तानात गुटखा फॅक्ट्री सुरू केली होती. याप्रकरणात जेएम जोशी दोषी सिद्ध झाला असून त्याला १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जोशीसोबतच जमीरुद्दीन अन्सारी आणि फारुख अन्सारी या दोघांनाही याप्रकरणात दोषी सिद्ध करण्यात आलं आहे. या दोघांनाही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
याच प्रकरणात माणिकचंद ग्रूपचे संस्थापक रसिकलाल धारीवाल देखील दोषी होती. पण २०१७ त्यांचं निधन झालं आणि त्यांना याप्रकरणापासून दूर करण्यात आलं आहे. या केसबाबत बोलायचं झालं तर रसिकलाल आणि जेएम जोशी आधी एकत्रच गुटख्याचा व्यापार करत होते. पण दोघांमध्ये आर्थिक वाद झाल्यानंतर दोघंही वेगळे झाले. जोशीनं त्यावेळी धारीवालपासून वेगळं होतं गोवा गुटखा नावाची दुसरी कंपनी सुरू केली होती. तरीही दोघांमध्ये स्पर्धा आणि वाद सुरूच होता. या दोघांमधील वादात त्यावेळी पाकिस्तानातून दाऊद इब्राहिम यानं मध्यस्थी केली होती असं सांगितलं जातं. यात पाकिस्तानात गुटखा फॅक्ट्री उभी करण्यासाठी मदत करण्याचं दाऊदनं म्हटलं होतं. आता हीच मदत करणं जेएम जोशीला महागात पडलं आहे. जोशी विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
दाऊदशी कनेक्शन कसं?जेएम जोशीवर फक्त पाकिस्तानात गुटखा फॅक्ट्री सेटअप करण्याचा आरोप तर आहेच. पण त्यासाठी २.६४ लाखांची मशीन पाकिस्तानात पाठवल्याचाही आरोप आहे. तसंच आपल्या कंपनीतील एका तज्ज्ञाला जबरदस्तीनं पाकिस्तानात फॅक्ट्री सेटअप करण्याच्या मदतीसाठी पाठवलं होतं. इतकंच नव्हे फॅक्ट्रीच्या उदघाटनासाठी देखील जेएम जोशी पाकिस्तानात गेला होता.
धक्कादायक बाब अशी की याप्रकरणातील इतर दोन आरोपी असलेले जमीरुद्दीन अन्सारी आणि फारुख अन्सारी हे दोघंही १९९३ सालच्या मुंबई बॉम्बस्फोटात सामील होते. आता जेएम जोशी यांच्या वकिलांकडून कोर्टात युक्तीवाद करताना कंपनीनं भारतात दिलेला रोजगार आणि सरकारला झालेल्या आर्थिक फायद्याची माहिती दिली. पण या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत कोर्टानं १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसंच ५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.