रिसोड : रिसोड शहरातील धोबी गल्लीतील पडक्या तीन खोलीतून दीड कोटींचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २३ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास पकडला. या कारवाईदरम्यान पोलीस अधीक्षक बच्चन सिंह स्वत: हजर असल्याने गुटखा व्यवसाय करणाºयांचे धाबे दणाणले.
पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे स्विकारल्यापासून बच्चन सिंह यांनी कारवाईचा धडाका लावला. दरम्यान, रिसोड शहर व परिसरात अवैध धंद्यांनी पुन्हा बस्तान मांडले असून, याकडे पोलीस अधीक्षकांनी लक्ष द्यावे, अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने यापूर्वी प्रकाशित केले होते. याची दखल म्हणून रिसोड तालुक्यात गुटखा किंगवर विशेष लक्ष ठेवण्यात आले. गुटख्याबाबत पोलीस अधीक्षकांना गुप्त माहिती मिळाल्याने बच्चन सिंह यांनी याप्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार २३ जानेवारी रोजी रिसोड शहरातील धोबी गल्लीतील तीन पडक्या खोलीत छापा मारला असता, एक कोटी ५० लाख रुपये किंमतीचा गुटखा आढळून आला. गुटखा जप्त केला असून, याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले. तुर्तास या दोघांचीही नावे गुप्त ठेवली असून, संपूर्ण चौकशी झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले.
सर्वात मोठी कारवाईरिसोड शहरातून दीड कोटी रुपये किंमतीचा गुटखा जप्त केल्याची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. स्वत: पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी कारवाई केल्याने स्थानिक पोलीस अधिकाºयांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
चोरीच्या घटनांचा लवकरच शोध!गुटखाप्रकरणी कारवाई केल्यानंतर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी रिसोड येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी गुटखा विक्री करणाºयांची यापुढेही गय केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. रिसोड शहर व तालुक्यातील चोरीच्या घटनांचा शोधही लवकरच लावला जाईल, अशी ग्वाहीदेखील पोलीस अधीक्षक सिंह यांनी दिली.