सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : गुन्हे शाखेने रबाळे एमआयडीसी येथून 35 लाखाचा गुटखा जप्त केला आहे. गुजरात मधून हा माल विक्रीसाठी नवी मुंबईत आला होता. मात्र ट्रक मधून इतर दोन वाहनांमध्ये हा गुटखा भरला जात असतानाच अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून कारवाई केली.
नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गे गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विकले जात आहेत. शहरातील छोट्या मोठ्या विक्रेत्यांना हा माल पुरवणाऱ्यांवर पोलीस नजर ठेवून होते. त्यानुसार गुन्हे शाखेचे अमली पदार्थ विरोधी पथक देखील त्यांच्या मागावर होते. अशातच गुजरात वरून ट्रक मधून मोठया प्रमाणात गुटखा येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार सचिन भालेराव यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सहायक आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत यांनी तपास पथक तयार केले होते. त्यात सहायक निरीक्षक विनया पारासूर, हवालदार सचिन भालेराव, कासम पिरजादे, इकबाल शेख, संजय चौधरी, रमेश उटगीकर, योगेश नाईक व बाबा सांगोलकर यांचा समावेश होता. त्यांनी गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास रबाळे एमआयडीसी मधील ओयो सिल्वर हॉटेल समोरील मोकळ्या मैदानभवती सापळा रचला होता. काही वेळाने त्याठिकाणी एक ट्रक (एम.एच. 14 एफ.टी. 410) येऊन थांबला असता इतरही दोन वाहने तिथे आली. यावेळी ट्रक मधून इतर पिकअप (एम.एच. 43 बी.बी. 1856) व कार (एम.एच. 43 ए.आर. 7601) या दोन वाहनांमध्ये गोण्या भरल्या जात असताना पोलिसांनी छापा टाकला. त्यांनी ट्रक मधून उतरल्या जाणाऱ्या गोण्या तपासल्या असता त्यात विमल कंपनीचा गुटखा आढळून आला. पोलिसांची कारवाई सुरु असताना ट्रक चालकाने अंधारात पळ काढला. मात्र इतर चौघे पोलिसांच्या हाती लागले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. जितू कार्तिकचंद्र दास (28), प्रियव्रत अभयकुमार दास (25), मुन्ना श्रीजनार्धन यादव (28) व अखेय बुद्धदेव खोंडा (22) अशी त्यांची नावे आहेत. ते कोपर खैरणे व इतर परिसरात राहणारे आहेत. त्यांच्याकडून 35 लाख 53 हजार रुपये किमतीचा गुटखा तसेच 14 लाख रुपये किमतीची तीन वाहने असा 49 लाख 53 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहेत.
चौकशीत त्यांनी हा माल गुजरात मधून आल्याची कबुली दिली आहे. मात्र ट्रक चालकाने पळ काढल्याने गुजरात मधून नेमका कुठून हा गुटखा आला याचा उलगडा होऊ शकला नाही. दरम्यान अटक केलेल्या चौघांसह पळालेल्या ट्रक चालकाविरोधात रबाळे एमआयडीसी पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे वरिष्ठ निरीक्षक बुधवंत यांनी सांगितले.