औसा (जि.लातूर) : शहरात चोरट्या मार्गाने गुटखा येत असल्याची खबर पोलिसांना मिळल्यावरून औसा पोलिसांनी ४ फेब्रुवारी रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास तुळजापूर टी पॉईंट जवळ गुटखा वाहतूक करणारी गाडी पकडली. मात्र, तब्बल चार दिवसानंतर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, शुक्रवारी मध्यरात्री गुटखा वाहतूक करणारी स्कॉर्पिओ क्र. एमएच २४ एएफ ०५४८ गाडी शहरात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांना मिळाली. त्यांनी आपल्या सहकार्यांना सदरील वाहनाची तपासणी करण्याच्या सूचना केल्या. यावर पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता त्यात राज्यात प्रतिबंधित असलेला आरएमडी पानमसाला, गुटखा, सुगंधी जर्दा, पान मसाला असा एकुण ८ लाख ३३ रूपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला.
या प्रकरणी औसा पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांच्या फिर्यादीवरून बिलाल इस्माईल शेख (रा. खोरी गल्ली, लातूर) याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. यावेळी पोलिसांनी गुटखा वाहतूक करणारी स्कॉर्पिओ गाडी अंदाजे किंमत सहा लाख रुपये असा एकुण १४ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
औसा पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला याबाबत माहिती दिल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी नसरीन मुजावर यांनी मंगळवारी जप्त मालाचे नमुने काढून त्याचा पंचनामा केला. याप्रकरणी त्यांनी औसा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून बिलाल शेख याच्याविरूध्द अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक निलम घोरपडे करीत आहेत.