सचिन राऊत, अकोला : खामगावमार्गाने अकोल्यात एका चारचाकी गाडीने आणण्यात येत असलेला गुटख्याचा साठा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाने पाठलाग करून सोमवारी पकडला. तीन लाख रुपयांच्या गुटख्यासह दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रीय महामार्गावरून शेगाव टी पॉइंट परिसरात एमएच ०४ इएस ५२३ क्रमांकाच्या झायलो गाडीमध्ये प्रतिबंधित गुटख्याचा साठा अकोल्यात आणण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी पथकासह या परिसरात नाकाबंदी केली. मात्र वाहन चालकाने त्याचे वाहन न थांबविता पाेलिसांना बघून पळ काढला़ त्यामुळे पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग करीत डाबकी रोड परिसरात हे वाहन ताब्यात घेतले़ मात्र त्यानंतर वाहनातील दोघेही जण पसार झाले असता पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून भगतवाडी परिसरात दोघांनाही ताब्यात घेतले.
या वाहनातील सुमारे तीन लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व हा गुटखा आणणारा शेख वाहिद शेख महमूद वय ३७ वर्ष राहणार भगतवाडी व शेख इरफान अब्दुल रहमान व ३१ वर्ष राहणार सोनटक्के प्लॉट यांना ताब्यात घेतले़ या दोघांविरुद्ध डाबकी रोड पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३२८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही कारवाई पोलीस अधीक्षक जी़ श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.