नवी मुंबई : शहरात विक्रीसाठी आणला जात असलेला १५ लाख रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांवर रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
महापे येथून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती परिमंडळ उपायुक्त विवेक पानसरे यांना मिळाली होती. त्याद्वारे सहायक निरीक्षक सलीम शेख यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने सोमवारी महापे परिसरात सापळा रचला होता. त्याठिकाणी संशयित वर्णनाचा टेम्पो येताच तो थांबवून चौकशी करण्यात आली. यावेळी टेम्पोत पीठ असल्याचे सांगण्यात आले. यामुळे पोलिसांनी सर्व गोण्या तपासल्या असता ३५ पैकी २० गोण्यांमध्ये पीठ तर १५ गोण्यांमध्ये प्रतिबंधित गुटखा आढळून आला.
याप्रकरणी अभिषेक कुमार तिवारी, रंजितकुमार राजभर यांना अटक करण्यात आली आहे. तर या गुटख्याची वाहतूक जय प्रदीप भानुशाली याच्यामार्फत होत असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार या तिघांवर रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून सुमारे १५ लाखाचा गुटखा व वाहतुकीसाठी वापरलेली वाहने असा एकूण ३० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.