नवी मुंबई : रबाळे एमआयडीसी येथून 7 लाख 15 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. एका हॉटेलमध्ये हा गुटखा साठवण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाला याची माहिती मिळाली असता छापा टाकण्यात आला.
लॉकडाऊन दरम्यान देखील शहरात चोरीच्या मार्गाने गुटखा व सिगरेट विकले जात आहेत. अशाच एका गुटखा विक्रीच्या ठिकाणाची माहिती गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. रबाळे एमआयडीसी मधील एका हॉटेलमधून हा गुटखा विकला जात होता. तर संबंधितांकडे मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा असल्याची देखील माहिती मिळाली होती.
त्यानुसार उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सहायक आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांनी पथक तयार केले होते. त्यामध्ये सहायक निरीक्षक निलेश तांबे, ज्ञानेश्वर भेदोडकर, उपनिरीक्षक संजय पवार, हवालदार पोपट पावरा, प्रदीप कदम, सागर हिवाळे, प्रकाश साळुंखे, सतीश चव्हाण, नवनाथ कोळेकर, सचिन धनवट, विजय पाटील व रुपेश कोळी यांचा समावेश होता. त्यांनी वेगवेळ्या ठिकाणी झडती घेत संशयीत ठिकाणाचा शोध घेतला.
यावेळी रबाळे एमआयडीसी मधील ईशिता हॉटेलच्या दर्शनी भागात गुटखा विक्री सुरु असल्याचे आढळून आले. त्याठिकाणावरून केराराम रुपाराम चौधरी (33) याला ताब्यात घेतले असता चौकशीत हॉटेलच्या गोडाऊन मधून 7 लाख 15 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. चौधरी हा मूळचा राजस्थानचा आहे. त्याच्याविरीधात रबाळे एमआयडीसी पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.त्याने हा गुटखा कोणाकडून खरेदी केला याचाही अधिक तपास पोलीस करत आहेत.