नवी दिल्ली - महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. हुंड्यासाठी एका विवाहितेचा प्रचंड छळ करून तिला अॅसिड पाजल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यांतच पती हैवान झाला असून सासरच्या मंडळींचं भयंकर रुप समोर आलं आहे. मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. तीन लाखांचा हुंडा न दिल्याने पतीने पत्नीला अॅसिड पाजलं आहे. विवाहितेची प्रकृती अत्यंत गंभीर असून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुलीच्या आई-वडिलांनी हुंड्यासाठी आपल्या मुलीचा खूप छळ आणि बेदम मारहाण केल्याची पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच सासरच्या मंडळींनी पैशासाठी मुलीला खूप त्रास दिल्याचं म्हटलं आहे. विवाहितेवर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं म्हटलं जात आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांनी देखील याबाबत ट्विट केलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ग्वाल्हेर जिल्ह्य़ातील सिमरिया गावातील 22 वर्षीय तरुणी शशी जाटव हिचं 17 एप्रिल 2021 रोजी रामगडच्या वीरेंद्र जाटवसोबत लग्न झालं होतं.
लग्नाला तीन महिनेही झाले नाहीत. तोपर्यंत आरोपी पतीने पत्नीचा छळ सुरू केला. शशीच्या घरच्यांनी तिच्या लग्नासाठी तब्बल दहा लाख खर्च केले होते. मात्र त्यानंतर काही दिवसांनी आरोपीने आपल्या पत्नीला माहेरहून तीन लाख रुपये घेऊन य़ेण्यास सांगितलं. मात्र विवाहितेने घरची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने पैसे आणण्यासाठी नकार दिला. यामुळे संतापलेल्या आरोपी पतीने पत्नीला अॅसिड पाजलं. या दुर्दैवी घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली. तिच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी तिला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र प्रकृती आणखी बिघडल्याने तिला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आलं.
विवाहितेच्या आईने याप्रकरणी पोलिसांत धाव घेत हा धक्कादायक प्रकार सांगितला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी याबाबत ट्विट करत या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पीडित महिलेचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. यावेळी विवाहितेने आपल्या पतीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. सासरची मंडळी त्रास देत असल्याचं म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणाचा वेगाने तपास करत असून एका आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.