ग्वाल्हेर: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील एका व्यक्तीनं पत्नीचा प्रचंड छळ केला आहे. पतीनं पत्नीला ४ वर्षे घरात डांबून ठेवलं. तिला पोटभर जेवण दिलं जायचं नाही. त्यानंतर तिला टीबी झाला. आता तिच्या टीबीनं गंभीर स्वरुप धारण केलं आहे. या प्रकरणी बहोडापूर पोलीस ठाण्यात महिलेनं तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी महिलेच्या पतीविरोधात हुंडा प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
ग्वाल्हेरच्या रामजी पूरा परिसरात राहणारी सोनिया आज मरणाशी झुंज देत आहे. तिचं वय २७ वर्षे आहे. मात्र तिची शारिरीक अवस्था एखाद्या पन्नाशीतल्या महिलेसारखी झाली आहे. पती आणि सासरच्या मंडळींनी केलेल्या अत्याचारांमुळे सोनियाची अवस्था गंभीर आहे. सोनियाचा विवाह १ जानेवारी २०१८ रोजी ग्वाल्हेरमध्ये राहणाऱ्या गुलफाम खाँसोबत झाला. सोनियाच्या आईनं लग्नात गुलफामला एक बाईक दिली. मात्र लग्नानंतर त्यानं ती विकली आणि सोनियाकडे दुसऱ्या गाडीचा आग्रह धरला. सोनियानं विरोध करताच तो मारहाण करू लागला.
हळूहळू गुलफामकडून होणारे अत्याचार वाढू लागले त्यानं तिला एका खोलीत बंद करून ठेवण्यास सुरुवात केली. सोनियाला खोलीत कोंडून गुलफाम कामाला निघून जायचा. संध्याकाळी कामावर परतल्यावर तो सोनियाला खोलीबाहेर काढायचा. तिच्याकडून घरातील सगळी कामं करून घ्यायचा. त्यानंतर तिला पुन्हा खोलीत बंद करायचा. गेल्या ४ वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. यादरम्यान तिनं एका मुलीला आणि मुलाला जन्म दिला.
गुलफामनं सोनियाला चार वर्षे एका खोलीत डांबून ठेवलं. या कालावधीत सोनियाला कधीच पोटभर जेऊ दिलं नाही. मानसिक आणि शारिरीक त्रासामुळे सोनियाला टीबी झाला. तिचा त्रास वाढल्यानंतर गुलफाम तिला मांत्रिकाकडे, हकिमाकडे नेलं. योग्य उपचार न मिळाल्यानं सोनियाचा त्रास आणखी वाढला. आता तिचा टीबी अखेरच्या टप्प्यात असून २७ वर्षांची सोनिया ५० वर्षांची दिसू लागली आहे.