मुंबई : अंधेरीत जिमचालकाला इन्स्टाग्रामवरून बॉडी सप्लिमेंट पुरवण्याच्या नावाखाली जवळपास २.७५ लाखांना फसविण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे.
तक्रारदार इकबाल सय्यद (३६) हे रिलायन्स मुंबई मेट्रो कार्यालयात डेप्युटी जनरल मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. तसेच ते गेल्या ५ वर्षांपासून अंधेरी पूर्व परिसरात जिम चालवतात. सय्यद यांना लागणाऱ्या विविध बॉडी सप्लिमेंट्स ते बाजारातून खरेदी करतात. त्यांना ८ मार्च रोजी इन्स्टाग्रामवर संजय सिंग नावाने संदेश पाठवत तो न्यूट्रिशन हब नावाची सप्लिमेंट्स पुरवठा कंपनी चालवत असल्याचे सांगण्यात आले.
तेव्हा सय्यद यांनी सिंगकडे चौकशी केल्यावर सप्लिमेंटची रक्कम ५० टक्के आगाऊ तर उर्वरित ही मालाची डिलिव्हरी झाल्यानंतर देण्याचे तो म्हणाला. त्याच्यावर विश्वास ठेवत सय्यद यांनी १३ मार्च रोजी त्यांच्या जिमसाठी २१ सप्लिमेंटची ऑर्डर दिली. त्याची किंमत १ लाख ६ हजार रुपये होती.
सय्यद यांनी त्याचे ७५ हजार रुपये जी पे मार्फत दिले. मालाची डिलिव्हरी १५ मार्चला देतो, असे सिंगने सांगितले. नंतर १४ मार्च रोजी सिंगने डीटीडीसी कुरिअरद्वारे पाठवलेल्या मालाचे ट्रेकिंग बारकोड व्हाॅट्सॲॅप केले. ज्यात त्यांचे पार्सल हे एमआयडीसी हबकडे पोहोचल्याचे दिसले.
१ हजार रुपयांची सप्लिमेंट पावडर कुरिअर मिळणार असा विश्वास पटल्याने सय्यद यांनी सिंगला पुन्हा नवीन सप्लिमेंटची ऑर्डर देत त्याची अर्धी रक्कम म्हणजे १ लाख त्याला ऑनलाइन पाठवले. मात्र जेव्हा सय्यद यांना पार्सल मिळाले त्यात अवघ्या १ हजार रुपयांची सप्लिमेंट पावडर मिळाली. आधी सय्यदनी काहीच सिंगला सांगितले नाही मात्र पुन्हा तो ३१ हजारांची मागणी केल्यावर जी पे लिमिट संपल्याचे म्हणत त्यांनी पैसे परत मागितले.