मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधून एका सनसनाटी गुन्ह्याचा उलगडा झाला आहे. येथे एका हॅकरने फ्रॉड करून चक्क गुगललाच गंडा घातला. या हॅकरच्या चलाखीमुळे गुगलने त्याच्या खात्यात २३ लाख रुपये ट्रान्सफर केले, मात्र गुगलला काहीच समजले नाही. मात्र अखेरीस मुंबई पोलिसांनी मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा भांडाफोड केला.
मुंबई पोलिसांच्या कांदिवली सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करताना मेकॅनिकल इंजिनियर ललित रघुनाथ देवकर याला अकाऊंड हॅक करून दुसऱ्या अकाऊंटमधून आपल्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करवल्याप्रकरणी अटक केली आहे. तसेच त्याच्या अकाऊंटमधून २० लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
सायबर सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरला वसावे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार मालाड पूर्वेतील दिंडोशी येथील रहिवासी आशिष भाटिया हे पेशाने चित्रपट प्रोड्युसर आहेत. त्यांनी सायबर सेलला सांगितले होते की, ते वेबसीरिजसह विविध प्रकारचे व्हिडीओ तयार करून यूट्युबवर अपलोड करतात. त्यांच्या व्हिडीओच्या सब्सस्क्रिप्शनच्या आधारावर गुगलकडून त्यांना दरमहा २० ते २५ लाख रुपये मिळतात. ते थेट बँक अकाऊंटमध्ये येतात.
मात्र एप्रिल महिन्यात जेव्हा त्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे आले नाहीत. तेव्हा त्यांनी माहिती घेतली तेव्हा समजले की, कुणीतरी त्यांचे बँक अकाऊंट हॅक केले. त्याने एवढ्या सफाईने हे काम केले की, ही चलाखी गुगललाही पकडता आली नाही. अखेर खऱ्या फिल्म प्रोड्युसरच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे पाठवण्याऐवजी गुगलने हॅकरच्या बनावट बँक खात्यात २३ लाख रुपये ट्रान्सफर केले.
दरम्यान, याबाबत समतानगर सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरला वसावे यांनी सांगितले की, उत्त प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलने तपासात पाहिले की, ज्या अकाऊंटमध्ये गुगलने पैसे पाठवले होते. ते अकाऊंट ललित देवकर याच्या नावे होते. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा समजले की, आरोपीने बँकेमध्ये अकाऊंट उघडले होते. दरम्यान, सायबर सेलने आरोपी देवकरच्या अकाऊंटला सील करून गुगलकडून हल्लीच त्या अकाऊंटमध्ये जमा केलेल्या २३ लाख ५० हजार रुपयांपैकी २० लाख रुपये जप्त केले आहेत.