नागपूर : दीड महिन्याआधी इंडिगो एअरलाइन्सचे नागपूर-इस्तंबूल आणि इस्तंबूल-नागपूर विमानाची २६ नोव्हेंबर आणि परतीची ८ लाख रुपये किमतीची १२ तिकिटे हॅकर्सनी रात्री ११ वाजता हॅक करून रद्द केली आणि पुन्हा पहाटे ५ वाजेपर्यंत त्याच प्र्रवाशांना तिकिटे इश्यू केली. तिकिटांचे ८ लाख रुपये इंडिगोच्या खात्यात जमा झाले आहेत. पण नव्याने इश्यू केलेल्या तिकिटांची जबाबदारी घेण्यास कंपनीने नकार दिला आहे. या प्रकरणाची चौकशी नागपूर सायबर क्राइम विभाग करीत आहे.
या प्रकरणाची तक्रार ट्रॅव्हल्स कंपनीच्या संचालकाने ७ सप्टेंबरला नागपूर सायबर क्राईम विभागाकडे केली आहे. सायबर क्राइमच्या चौकशीत जे तथ्य बाहेर येईल, त्या आधारे इंडिगो कंपनी निर्णय घेणार असल्याचे मत कंपनीच्या अधिकाऱ्यांचे आहे. प्राप्त माहितीनुसार, पुष्पक ट्रॅव्हल्सचे संचालक कौशल्य दुलारिया यांनी सोहनी एन्टरप्राइजेसचे कमल जोशी यांच्या आयडीवरून विमानाची तिकिटे बुक केली होती. तिकिटे हॅक झाल्याचे प्रकरण पुढे आल्यानंतर कमल जोशी यांनी सायबर क्राईम विभागाकडे ७ सप्टेंबरला तक्रार नोंदविली. त्यानंतर विभागाचे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. ते अद्यापही निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणी संशय गडद वाढला आहे.
मुख्यत्त्वे तिकिटांचे बुकिंग पुष्पक ट्रॅव्हल्सचे कौशल्य दुलारिया यांनी केल्याने ग्राहकांना सेवा देण्याची त्यांची जबाबदारी आहे. कौशल्य दुलारिया यांनी सांगितले, या प्रकरणी नागपुरातील इंडिगोच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधला. पण ते जबाबदारी घेण्यात तयार नाहीत, सहकार्यही करीत नाहीत आणि तिकिट व रक्कम परत करीत नाहीत. हॅकर्सनी तिकिटे रद्द केल्यानंतर रक्कम इंडिगोच्या खात्यात जमा झाल्याने ग्राहकांना नवीन तिकिटे जारी करण्याची जबाबदारी विमान कंपनीची आहे.
७ सप्टेंबरला तक्रार नोंदविली, पण त्यावर अद्यापही निष्कर्ष न निघाल्याने चिंतेत आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना आहे, पण त्याकरिता आम्ही जबाबदार नसल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. सायबर क्राइम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीत जो निष्कर्ष निघेल, त्यावर कंपनी निर्णय घेणार असल्याचे इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.