चेन्नई : दिल्लीतील एम्सचे सर्व्हर हॅक केल्यानंतर हॅकर्सनी तामिळनाडूतील श्री सरन मेडिकल सेंटरच्या दीड लाख रुग्णांची वैयक्तिक माहिती (पर्सनल डेटा) चोरून ऑनलाइन विकली आहे. सायबर धोक्यांवर लक्ष ठेवणारी कंपनी ‘क्लाऊडसेक’ने या डेटा चोरीची (डेटा ब्रीच) माहिती दिली. रुग्णांचा वैयक्तिक डेटा सायबर क्राईम फोरम व टेलिग्राम चॅनलवर विकला गेला आहे. हा डेटा सॉफ्टवेअर पुरवणाऱ्या थ्री क्यूब आयटी लॅब या तिऱ्हाईत कंपनीकडून मिळवण्यात आला होता.
‘एम्स’चे सर्व्हर १२ दिवसांपासून हॅकदेशातील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय असलेले नवी दिल्ली येथील एम्सचे (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) सर्व्हर २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजल्यापासून बंद आहे. सर्व्हर हॅक करणाऱ्यांनी तब्बल २०० कोटींची मागणी केली. हॅकर्सनी क्रिप्टोकरन्सीमध्ये खंडणी देण्यास सांगितले आहे. एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने हा दावा केला आहे. मात्र, पोलिसांनी खंडणी मागितल्याचा इन्कार केला.या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी एम्स हॅकिंगमागे चीनचा हात असल्याचे म्हटले आहे. सायबर सेलच्या मते हॅकिंग दरम्यान वैयक्तिक डेटादेखील लीक झाला. हा डेटा डार्क वेबच्या मुख्य डोमेनवरही असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतातील व्हीव्हीआयपींसह लाखो रुग्णांचा गुप्त डेटा लीक हाेण्याची शक्यता बळावली आहे.