लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लग्नाचे आमिष दाखवून मुंबईत आणलेल्या उत्तर प्रदेशच्या तरुणीचा वेश्या व्यवसायासाठी चाळीस हजारांत सौदा होणार होता, अशी धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे प्रियकराचा डाव फसला आणि विक्रीपूर्वी तो टिळकनगर पोलिसांच्या जाळ्यात अडकला गेला.
टिळकनगर पोलिसांनी अमन शर्मा आणि त्याची पत्नी आंचल शर्माला अटक केली आहे. तक्रारदार १८ वर्षीय तरुणी मूळची उत्तरप्रदेशच्या शेतकरी कुटुंबातील आहे. तेथे आई-वडील आणि तीन भावंडांसोबत राहते. घरच्यांशी तिचे पटत नव्हते. यादरम्यान फेब्रुवारीमध्ये तिची तेथील एका दुकानात अमनसोबत ओळख झाली. दोघांमध्ये संवाद वाढला. भेटीगाठी वाढून दोघांमध्ये प्रेमसंबंध झाले. तीन ते चार दिवसांपूर्वी अमनने ‘हम यहाँसे कही दूर भाग जा के शादी करेंगे’ असे म्हटले होते. मुंबईत जाऊन तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिनेही त्याच्यासोबत सुखी संसाराचे स्वप्न रंगविण्यास सुरुवात केली.
ठरल्याप्रमाणे अवघ्या तीन महिन्यांच्या ओळखीतून १८ मे रोजी अमनने घराजवळून तिला सोबत घेत रेल्वेने बनारस गाठले. तेथून मुंबईला जाणार असल्याचे सांगितले. रविवारी पहाटे चारच्या सुमारास ती लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचली. तेथे पोलिसांनी वेळीच धाव घेत तरुणीची सुटका केली आहे.
बायकोला बनवले वहिनी बनारस येथे पोहोचल्यानंतर, आंचल ८ महिन्यांच्या बाळासहित तेथे धडकली. ती भावाची बायको असल्याचे सांगून सोबत मुंबई फिरण्यासाठी येत असल्याचे अमनने तरुणीला सांगितले होते.
रिक्षाचालकाचा कॉल अन् सुटका... लोकमान्य टिळक टर्मिनस येथे अमन एका रिक्षाचालकाकडे गेला. तेथे रेड लाईट एरियाबाबत चौकशी करताच, रिक्षाचालकाने तेथे का जायचे? याबाबत विचारले. अमनने तरुणीच्या दिशेने इशारा करत तिला ४० हजारांत तेथे विकायचे असल्याचे रिक्षाचालकाला सांगितले. रिक्षाचालकाला संशय आला. त्याने, तत्काळ पोलिसांना माहिती दिली. टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेत मुलीला सुखरूप ताब्यात घेत, अमन आणि त्याच्या बायकोला बेड्या ठोकल्या आहेत.