ठाणे - गुगलवरून टाटा प्लेचा कस्टमर केअर घेणे ठाण्यातील धवल ठक्कर (४९, रा. वसंतविहार, ठाणे) या ग्राहकाला चांगलेच महागात पडले. त्यांना मिळालेल्या क्रमांकावर त्यांनी संपर्क साधल्यानंतर त्यांना टाटा एनीडेस्क ॲप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून पाच लाखांची रक्कम काढून त्यांना गंडा घातला. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती चितळसर पोलिसांनी मंगळवारी दिली.
वसंत विहार येथील रहिवासी ठक्कर यांच्या घरातील टीव्ही स्क्रीनवर टाटा प्ले सुरू होत नव्हते. त्यामुळे त्यांनी गुगलवरून १४ जानेवारी रोजी कस्टमर केअर क्रमांक घेतला. संबंधित क्रमांकावर त्यांनी रात्री ९:३० ते १० वाजेदरम्यान संपर्क केला. तेव्हा त्यांना अनोळखी मोबाइलधारकाने फोन केला. या मोबाइलधारकाने त्यांना टाटा एनीडेस्क हे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर ठक्कर यांच्या पंजाब नॅशनल बँकेच्या कॅश क्रेडिट खात्यातून पाच लाखांची रक्कम नेट बँकिंगद्वारे परस्पर काढून घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. या प्रकाराबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी आरोपींविरुद्ध फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत १६ जानेवारी २०२३ रोजी गुन्हा दाखल केला आहे.