पाकिस्तान - मुंबईवरील २६/११ या भीषण दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी (टेरर फंडिग) लाहोरमधील दहशतवाद विरोधी कोर्टाने दोषी ठरविले आहे. या प्रकरणी गेल्या शनिवारीच सुनावणी होणार होती. मात्र, हाफिज सईदसोबतचा सहआरोपी सुनावणीला उपस्थित नसल्याने सुनावणी ११ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली होती.
दहशतवादविरोधी कोर्टाचे न्या. मलिक अरशद भुट्टा यांनी सईद आणि त्याच्या सहकाऱ्यांवर पंजाब प्रांतातील विविध शहरांमध्ये दहशतवादी संघटनांना पैसा पुरवल्याचा आरोप निश्चित केला आहे. याआधी शनिवारी कोर्टाला हाफिज सईदविरोधात टेरर फंडिग प्रकरणी आरोपांची निश्चिती करता आली नव्हती. कारण, या महत्वाच्या सुनावणीवेळी पोलिसांना सहआरोपीस कोर्टासमोर हजर करता आले नव्हते. पंजाब पोलिसांच्या दहशतवाद विरोधी विभागाने सईद आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात टेरर फंडिंगच्या आरोपाखाली पंजाब प्रांतातील विविध शहरांमध्ये २३ गुन्ह्यांची नोंद केली होती आणि जमात-उद-दावाचा प्रमुख सईदला १७ जुलै रोजी अटक केली होती. सध्या लाहोर येथील अतिसुरक्षित कोट लखपत तुरुंगात हाफिज कैद आहे.