मुंबईत झालेल्या २६/११ या भीषण दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उद दावाचा प्रमुख हाफिज सईदला पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा टेरर फंडिंगच्या दोन प्रकरणी सुनावण्यात आली आहे. पंजाबच्या न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात १६६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता तर ३०० हुन अधिक लोक जखमी झाले होते. या हल्ल्याने मुंबई हादरून गेली होती. दहशतवाद विरोधी न्यायालयाने जमात उद दावाच्या हाफिज सईदची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले असून १ लाख १० हजार रुपयांचा दंडही सुनावला आहे.
सईदचे दोन साथीदार जफर इकबाल आणि याहया मुजाहिद यांना साडेदहा वर्षांची शिक्षा झाली आहे. तसेच अब्दुल रहमान मक्की याला 6 महिन्यांचा तुरुंगवास झाला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने हाफिज सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे. दहशतवाद्यांना पैसे पुरवल्याचा त्याच्यावर ठपका आहे. फेब्रुवारी महिन्यात दहशतवाद विरोधी न्यायालयाने त्याला ११ वर्षांची शिक्षा सुनावली होती. सध्या हाफिज लाहोरमध्ये कडेकोट सुरक्षा असलेल्या लखपत येथील तुरुंगात आहे.