सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील गुन्हेगारांवर अंकुश आणण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून एका वर्षात तडीपार गुंडांची हाफ संच्युरी झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे, सहायक पोलिस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी पत्रकारांना दिली. तसेच येणाऱ्या महापालिका निवडणुकीपूर्वी अनेक गुंड कारवाईच्या वेटिंगलिस्टवर असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली.
उल्हासनगरात गुन्हेगारीचा ग्राफ वाढताच गुंडावर कायद्याचा अंकुश ठेवण्यासाठी रेकॉर्डवरील गुंडाची यादी पोलीस परिमंडळ कडून बनविण्यात आली. तत्कालीन पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी झोपडपट्टी दादांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली होती. शहरातील चारही पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, मधुकर कड, संजय गायकवाड व लक्ष्मण सारिपुत्र यांनी काढलेल्या यादीप्रमाणे यापूर्वी एका वर्षात ४८ गुंडावर तडीपार, मकोका अंतर्गत कारवाई करून नाशिक तसेच पुणे येरवडा कारागृहात स्थानबद्धतेची कारवाई केली होती.
उल्हासनगर पोलीस परिमंडळ-४ चे नवनियुक्त पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांनी एका राजकीय पक्षाच्या संबंधित असलेला कुलदीप मुकेश कंजानिया उर्फ भोळा आणि हिरा उर्फ हिरो कुकरेजा या गुंडांवर गेल्या आठवड्यात तडीपार कारवाई केली. भोळा याच्यावर ४ तर हिरा या गुंडावर तब्बल १० गुन्ह्यांची नोंद आहे. याव्यतिरिक्त काही गुंड पोलिसांच्या वेटिंगलिस्टवर असून महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी या सराईत गुंडावर तडीपारीची कारवाई केली जाणार असल्याचे संकेत पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांनी दिली आहे.